थकवणारा नाही तर थक्क करणारा प्रवास! Unknown Explorers- (अनोळखी अन्वेषक) The Leh डायरी Unknown Explorers या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही नाव या समूहाला असूच शकत नाही, प्रवासाला सुरुवात केली त्या आधी खूप मोजकी लोकं एकमेकांना ओळखत होती आणि प्रवास तास बऱ्यापैकी मोठा आणि आव्हानात्मक होता. अनोळखी प्रदेश आणि अनोळखी लोकं तीही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतुन आलेली एकत्र येतात काय आणि लेह-लदाख ला जायची योजना आखातात काय हि कल्पना ऐकायलाच किती मनोरंजक वाटते ना, हि कल्पना सत्यात उतरवायला आम्ही मनाची तयारी करत होतो. बघता बघता तो दिवस आला ज्या दिवशी प्रवासाला सुरुवात करायची होती. काही मंडळी मुंबईतून तर काही मंडळी पुण्याहून चंदीगडला पोचली. ठरल्याप्रमाणे दिल्ल्ली मार्गे चंदीगड विमातळावर सर्व एकमेकांना भेटले. अनोळखी आणि उत्सुक लोकं एकमेकांना भेटत होती आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. पुढचे ९ दिवस ज्या लोकांबरोबर हा स्वप्नवत प्रवास करायचा होता त्यांचाबरोबर चांगला सूर जुळणं खूप गरजेचं होतं कारण समुद्र सपाटी च्या आसपास राहणारी आम्ही सर्व मंडळी साधारण १७ ते १८ हजार फुटांच्या उंचीवर जाणार होतो आणि येणाऱ्या काही दिवसात मानसिक, वैचारिक आणि अश्या विविध पातळ्यांवर एकमेकांना एकमेकांची गरज लागणार होती याची प्रत्येकालाच कल्पना होती.