थकवणारा नाही तर थक्क करणारा प्रवास!
Unknown Explorers- (अनोळखी अन्वेषक) The Leh डायरी
Unknown Explorers या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही नाव या समूहाला असूच शकत नाही, प्रवासाला सुरुवात केली त्या आधी खूप मोजकी लोकं एकमेकांना ओळखत होती आणि प्रवास तास बऱ्यापैकी मोठा आणि आव्हानात्मक होता. अनोळखी प्रदेश आणि अनोळखी लोकं तीही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतुन आलेली एकत्र येतात काय आणि लेह-लदाख ला जायची योजना आखातात काय हि कल्पना ऐकायलाच किती मनोरंजक वाटते ना, हि कल्पना सत्यात उतरवायला आम्ही मनाची तयारी करत होतो. बघता बघता तो दिवस आला ज्या दिवशी प्रवासाला सुरुवात करायची होती. काही मंडळी मुंबईतून तर काही मंडळी पुण्याहून चंदीगडला पोचली.
ठरल्याप्रमाणे दिल्ल्ली मार्गे चंदीगड विमातळावर सर्व एकमेकांना भेटले. अनोळखी आणि उत्सुक लोकं एकमेकांना भेटत होती आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. पुढचे ९ दिवस ज्या लोकांबरोबर हा स्वप्नवत प्रवास करायचा होता त्यांचाबरोबर चांगला सूर जुळणं खूप गरजेचं होतं कारण समुद्र सपाटी च्या आसपास राहणारी आम्ही सर्व मंडळी साधारण १७ ते १८ हजार फुटांच्या उंचीवर जाणार होतो आणि येणाऱ्या काही दिवसात मानसिक, वैचारिक आणि अश्या विविध पातळ्यांवर एकमेकांना एकमेकांची गरज लागणार होती याची प्रत्येकालाच कल्पना होती.
पहिला टप्पा चंदीगड ते मनाली अश्या प्रवासाचा होता, साधारण ३१० किलोमीटर्सचा हा रस्ता संपूर्ण घाटाचा होता. मंडळी तशी एकमेकांना तितकी जास्त ओळखत नव्हती आणि म्हणून गप्पा तश्या बेताच्याच होत होत्या. जेवणाचे आणि इतर थांबे घेत-घेत दुपारी साधारण १ वाजता सुरु झालेला प्रवास रात्री १२ च्या सुमारास मनाली मध्ये संपला. एव्हाना पुढे येणाऱ्या आव्हानाची पुरेपूर कल्पना सर्वाना आली होती कारण लेह – लदाख रोड ट्रिप हि तितकी काही साधी गोष्ट नाही याची खात्री वाटायला आता सुरुवात झाली होती. मनाली मधील हॉटेल मधे रात्रभर अराम करून पुढच्या प्रवासाला दुसऱ्या दिवशी सकाळी सुरुवात झाली.
मनाली ते जिस्पा असा १४० किलोमीटर्स प्रवास खूप मोरंजक होता, आमच्या वाहनचालकाचं आणि हिंदी गाण्यांचं सूत अजिबात जुळत नव्हतं, त्याचं पंजाबी गाण्यांचं प्रेम तो आमच्यावर लादत होता आणि प्रत्येक वळणावर समोरून येणाऱ्या वाहन चालकाला सल्ला देण्याची कला गाडीतील प्रत्येकाला भावली होती. मनाली पासून पुढे रोथांग पास ला मनसोक्त photography करून आम्ही पुढे निघालो. थोड्यावेळानंर पंजाबी गाण्यांची नाईलाजाने सवय करून घेऊन आम्ही साधारण संध्याकाळी ६ ला जिस्पा ला पोचलो. भागा नदी पात्राच्या अगदी समोर असलेल्या हॉटेल मधे आमचा मुक्काम होता, गरमा-गरम चहा चा आस्वाद घेऊन सगळी मंडळी भागा नदीपात्रात छायाचित्र काढायला पळाली. सूर्यास्त होत होता तसा-तसा हवेतील गारवा वाढत होता, जॅकेट्स, स्वेटर, कानटोप्या असे गरम कपडे बाहेर आले. रात्रीच्या जेवणाला बऱयापैकी ओळखी झाल्या. गोष्टी, विनोद, कोडी करता करता गप्पांचा फड रंगला आणि खऱ्या अर्थाने या रात्री मंडळी सुट्टी च्या रंगात आली. पुढच्या दिवशी जिस्पा ते लेह असा सर्वात मोठा प्रवास करायचा होता. वाहनचालकाने सकाळी ५ वाजताची वेळ दिली होती. अंग गोठवणारी थंडी आणि त्यात सकाळी ५ वाजता उठायचं ये कल्पनेनंच अर्ध्या मंडळींना झोप आली नाही.
जिस्पा ते लेह हा ३६० किलोमीटर्स चा प्रवास साधारण १२ तासांचा होता. अवघड आणि नागमोडी वळणं, खड्ड्यांचा साम्राज्य असलेला रस्ता आणि आमच्या वाहनचालकाची पंजाबी गाणी असा विचित्र संयोग घडून आला होता. जसे-जसे लेह चा जवळ जात होतो तस-तस हवेतील Oxygen चे प्रमाण कमी होत होते आणि ते श्वासोच्चवासत जाणवत सुद्धा होते. नाकपुड्यांवर कापूरने भरून आणलेला पिशव्या दार १० मिनिटाने लावायला सुरुवात झाली. १२ तासांचा हा प्रवास म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रासाची कसोटी होती. सरचू नावाच्या एका गावात पाहाडोवाली मॅगी आणि ऑम्लेटवर ताव मारला.पुढे पुढे रस्ता इतका बिकट होत होता कि वाहनचालकाच्या चेहऱ्यामध्ये आम्हाला चक्क देवदूतच दिसत होता. वाकड्या तिकड्या वळणांवर गाडी चालवण्याच्या त्याच्या कलेवर प्रत्येक जा फिदा होत होता. मजल दरमजल निळे होत जाणारे आकाश, रस्त्याच्या दोनी बाजूला उंचच उंच डोंगर, हजारो फूट खोल दऱ्या आणि खाली कुठे तरी वाहणारी नदी यांच्याबरोबर जणू काही एक नातं तयार झालं होतं. या प्रवासात तोकडे रस्ते, घाट, अवघड वळणे यांची भीती जणू आयुष्यभरासाठी संपली असं म्हणायला हरकत नव्हती. रात्रीच्या जेवणाच्या सुमारास लेह ला हॉटेल मधे पोचलो तेव्हा डोकं गोल गिरक्या घेत होतं, एकतर तो अवघड वळणाचा रस्ता आणि आता लेह मधे हवेमधे Oxygen ची कमतरता ज्यामुळे श्वास घ्यायला जड जात होतं. पटकन रात्रीचं जेवण करून सगळे आप आपल्या खोल्यांमधे गेले कारण प्रत्येकालाच आरामाची खूप गरज होती.
प्रवासाच्या चवथ्या दिवशी लेह मधील काही खूप विशिष्ट ठिकाणांना भेट द्यायचं ठरलं होतं, त्यातीलच एक सर्वात महत्वाचं ठिकाण म्हणजे ‘Hall OF Fame’ musium. भारतीय सैन्य दलाची इंतम्भूत माहिती या Musium मधे आहे. पाकिस्तान आणि चीन बरोबर झालेल्या युद्धाची अंगावर काटा आणणारी माहिती इथे उपलध आहे. दिवसाच्या पुढील भागात झंस्कार आणि सिंधू या दोन नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो ते ठिकाण बघण्यासाठी गेलो, परत येताना Magnatic Hill बघितलं, त्या दिवशीचं दुपारचं जेवण लेह मधल्या गुरुद्वारात लंगर मधे केलं तो एक खूप वेगळाच अनुभव होता. संध्याकाळी लेह Palace बघून खरेदी साठी लेह च्या मार्केट मधे गेलो. कुठल्याही थंड हवेच्या ठिकाणी असते तशीच लेह मधे सुद्धा बाजारपेठ खुलली होती फरक फक्त इतकाच होता भरपूर विदेशी लोकं बाजारात दिसत होते, त्यांचा वावर इतका सहज होता जणू ते स्वतःच्याच देशात फिरत असावेत. चौका-चौकात त्यांचे खेळ सुरु होते, रंगीबेरंगी जॅकेटस, पश्मीना शाली, अस्सल चामड्याच्या वस्तू, स्त्रीयांसाठी दाग-दागिने मांसाहारी खाणाऱ्यांसाठी गरम-गरम कबाब असा एकूणच बाजाराचा थाट होता, प्रत्येकाच्या आवडी-निवडी प्रमाणे मनसोक्त खरेदी केली गेली आणि तो संपूर्ण दिवस लेह ला explore करण्यात सार्थकी लागला.
पुढच्या दिवशी आम्ही आमचा प्रवास Nurbra Valley च्या दिशेने सुरु केला. तिकडे १ रात्रीचा मुक्काम असल्याने मोठ्या Bags लेह च्या हॉटेल मधेच सोडून फक्त १ दिवसांचे कपडे घेऊन आम्ही हा प्रवास सुरु केला. हा प्रवास ६ तासांचा होता, या रस्त्यात मध्ये जगातील सर्वात उंच रस्ता (Worlds highest motorale Road) खारडुंगला पास आहे ज्याची उंची समुद्र सपाटीपासून १७९८२ फूट आहे. योगायोगाने त्या दिवशी Friendship Day सुद्धा होता. जगातील सर्वात उंच रस्त्यावर केक कापून आम्ही हा Friendship Day साजरा केला. पुढे Diskit Monastary ला भेट दिली तो अनुभव सुद्धा लक्षात राहणार होता. आमचा मुक्काम Diskit गावातील एका छान Tented campsite मधे होता. समोरच मोठा डोंगर मागच्या बाजूला जंगल आणि मधोमध आमची ही Tented campsite! Nubra Valley ओळखली जाते ती म्हणजे silver Sand Dunes साठी. दोन कुबड असलेल्या उंटांवर सफारी चा आनंद घेत आम्ही तो संध्याकाळ मस्त घालवली. तिथल्या थंडी मधे Tent मधे राहण्याचा अनुभव वेगळाच रोमांच आणणारा होता. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा ६ तासांचा प्रवास करत लेह ला आलो. पुढच्या दिवसासाठी आम्ही सगळेच खूप excited होतो कारण ३ Idiots चित्रपटानंतर नावारूपाला आलेल्या Pangog Lake ला आम्ही भेट देणार होतो.
पॅनगॉग चा प्रवास पुन्हा लेह पासून ६ तासांचा होता, एव्हाना सगळयांना High Altitude ची बऱ्यापैकी सवय झाली होती. आम्ही लेह मधे पोहोचल्या नंतर गाड्या बदलल्या होत्या आणि म्हणूनच आता आमच्या आवडीची गाणी ऐकत, आणि विविध विषयांवर गप्पा मारत मारत ६ तासांचा ही वेळ कधी निघून गेली काहीच समजले नाही. प्रवास संपवून जेव्हा आम्ही Pangong Lake ला पोहोचलो आणि पहिल्यांदा जेव्हा तेथील नजारा बघीतला तो क्षण डोळ्यासमोरून जात नाही. आम्ही पोचलो तेव्हा सूर्यास्त आत्ताच झालं होता तरीही भरपूर उजेड होता, वरती निळे आकाश आणि खाली Pangong Lake चे निळे पाणी याचा एक वेगळाच संयोग दिसत होता. निळ्या रंगाच्या वेगवेगळया छटा अनुभवायला मिळत होत्या आणि आम्ही त्या डोळ्यात आणि छाया चित्रांमध्ये साठवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. Lake च्या समोरच पुन्हा एकदा Tent मधे राहण्याची आमची सोय करण्यात आली होती. संध्याकाळी तापमान साधारण 7-8 डिग्री होतं आणि रात्री ते अजून खाली जाण्याची शक्यता होती. समोरच अथांग पसरलेलं Pangong Lake, बोचरी थंडी जोरदार सुटलेला वारा आणि त्यात पाऊस आला तेव्हा तर हा क्षण पुढे सरकूच नये असं वाटत होतं. पुन्हा एकदा गप्पांना रंग चढला होता. कुणी आपले अनुभव सांगत होता तर कुणी मधेच भुताच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, तर कुणी आपल्या कविता ऐकवल्या. जणूकाही एखादी मेहफिल रंगावी तसाच काहीसा हा अनुभव होता. कुडकुडणाऱ्या थंडीत ३-4 ब्लँकेट्स मधे स्वतःला गुंडाळून प्रत्येकाने झोपण्याचा यशस्वी/अयशस्वी प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाही. सकाळी सूर्योदयाच्या आधीच आम्ही सगळे जागे होतो तो म्हणजे Pangong Lake वरून होणाऱ्या सूर्योदय बघण्यासाठी. हळू हळू सूर्य नारायणाने दर्शन दिले आणि तो क्षण बघून आम्ही सगळे खऱ्या अर्थाने भारावून गेलो. एका बाजूला हाडं गोठवणारी थंडी आणि दुसरीकडे Pangong Lake चे निळे तरीही सूर्याच्या किरणानें चकाकणारं पाणी म्हणजे एक जादुई combination होतं. कित्येक छायाचित्रकार त्यांचा कॅमेरा घेऊन त्यांना हवा तसं छायाचित्र मिळावा म्हणून तासंतास किनाऱ्यावर बसून होते, निळ्या पाण्याकडे बघून तंद्री लागावी असाच मंत्रमुग्ध करणारा तो क्षण होता. बराच वेळ Lake च्या किनारी बसून, फेरफटका मारून, Photos काढून आम्ही पुन्हा त्या संध्याकाळी लेह ला परतलो. ३ Idiots चित्रपटात जी शाळा दाखवली आहे तिला भेट देऊन पुन्हा माही आमच्या लेह च्या हॉटेल मधे परतलो. गेल्या ८ दिवसांचा गोषवारा घेत आम्ही रात्री हॉटेल मधे गप्पा मारत मारत जेवण केलं.
पहिल्या दिवशी एकमेकांना नं ओळखणारे आम्ही आता इतके समरस झालो होतो की आता निरोप घेण्याची वेळ आली हे मान्य होत नव्हतं. एकमेकांचे Facebook, Instagram आणि इतर ID घेत जड अंतःकरणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. लेह-लदाख रोड ट्रिप म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. सतत प्रवास, कमी प्राणवायू, अरुंद रस्ते असे कितीतरी खडतर अनुभव देणारी ही ट्रिप जेव्हा पूर्ण होते तेव्हा एक वेगळंच समाधान मिळत. माझी ही ट्रिप इतक्या लवकर का संपली हा प्रश्न अजून पडलाय.
शेवटी इतकाच सांगेन की या ट्रिप मधून जर मी काही शिकलो असेल तर ते म्हणजे बुद्धाचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे Happiness is a journey and not a destination” Its important to focus on the journey (moment by moment) which is more important than the destination”.
Bhavin brings forth is experience of large scale operations and School excursions to Pugmarks on the table having been part of the travel industry for over 15+ years. A wanderer and a wanna be poet.